GOLD गोल्ड / सोने, कांचन, हेम, हिरण्य, कनक, सुवर्ण / Aurum ऑरम
मागील भागात (3.1 Classification of Metals / धातूंचे वर्गीकरण) आपण धातूंचे लोहयुक्त (Ferrous) धातू, लोहेतर (Non – Ferrous) धातू असे वर्गीकरण पाहिले. त्यातील लोहेतर धातूंमधील “मौल्यवान धातू” (Precious Metal) पैकी एक असलेल्या “सोने” (GOLD) ह्या धातूची माहिती आपण घेऊ. |
GOLD
Symbol: Au
Latin: aurum
Appearance: Metallic Yellow
Standard Atomic Weight (Au): 197.2
Atomic Number (Z): 79
Melting Point: 1064.18 °C / 1947.52 °F (1337.33 K)
Boiling Point: 2970 °C / 5378 °F (3243 K)
Density (near r.t.): 19.30 g/cm3
“सोने” (GOLD) एक धातुरूप मूलद्रव्य (Metal Element) असून, ऑरम (Aurum) या लॅटिन नावावरून रासायनिक चिन्ह Au आले आहे. ऑरम (Aurum) ह्या शब्दाचा चा अर्थ ‘झळाळणारी पहाट’ असा होतो. ह्या धातूचा आवर्त सारणीतील अणुक्रमांक “७९” आहे. शुद्ध सोन्याची चकाकी व रंग हे कधीही मलीन होत नाहीत, सोन्यावर वातावरणाचा आणि साधारण एसिड चा परिणाम होत नाही. ह्याच कारणाने त्याचा दागिन्यातील वापर सर्वाधिक आहे. सोने हा धातू उष्णता व विद्युत यांचा उत्तम सुवाहक असून, शुद्ध स्वरूपातील सोने हे अतिशय तन्य (Tensile) व वर्धानीय (Malleable) असते. २८ ग्रॅ. सोन्याचा सु. १७ चौ. मी. आकाराचा अगदी पातळ असा पत्रा (वर्ख / Foil) तयार करता येतो.
इतिहास:
प्रागैतिहासिक मानव इतिहासातील सुरवातीच्या काळातच “सोने” (Gold) या मौल्यवान धातूचा शोध लागला. (पहिला शोध सोन्याचा की तांब्याचा ह्यावर एकमत नसले; तरी बहुतेक अभ्यासकांच्या मते सर्वप्रथम ‘तांबे’ (Copper) सापडले व त्यानंतर सोन्याचा शोध लागला असावा)
इ. स. पू. ४००० च्या सुमारास ईजिप्त व मेसोपोटेमिया प्रांतातील प्राचीन ईजिप्शियन, मिनोअन (इजीअन), ॲसिरियन व इट्रस्कन संस्कृतींमधील कारागिरांनी सोन्यात घडवलेल्या पुष्कळ वस्तू सापडल्या असून त्यातील बहुतेक वस्तू ह्या अखंड स्वरूपात सापडल्या आहेत. इ. स. पू. ३००० च्या काळात सोन्याच्या वळींचा वापर व्यवहार व मोबदला देण्यासाठी केला जात असावा. इसवी सनाच्या सुरवातीस इजिप्त हे सोन्याचे प्रमुख उत्पादन केंद्र होते तसेच भारत, आयर्लंड, गॉल व आयबेरियाचे द्वीपकल्प येथेही त्यावेळेस सोने वापरले जात होते. सोन्याचा बहुतेक वापर हा हत्यारे, दागिने, मूर्ती, पात्र, इत्यादींचे अलंकरण म्हणूनच होत असला तरी नाण्यांच्या स्वरूपात व्यवहारासाठी होत होता.
इसवी सनाच्या पूर्वीपासून सोन्याच्या शुद्धीकरणासाठी यांत्रिक पद्धतीचे विविध टप्पे असल्याचे पुरावे सापडले आहेत.
सुरवातीच्या काळात जलोढीय खळग्यात (placer : पाण्याच्या प्रवाहात तयार झालेले खळगे, जेथे गाळाची माती साचत असते.) खाणकाम करून सोने काढीत असत. म्हणजे नदीच्या गाळातील सोन्याचे कण मिळवीत असत. पाण्याने धुतल्यामुळे वजनाला हलकी असलेली वाळू निघून जाई व सोन्याचे जड कण मागे राहून सोन्याचे प्रमाण वाढत असे. नंतर सोन्याचे कण वितळवून चांगले सोने मिळवले जाई.
इ. स. पू. २००० सालापर्यंत लवणामार्फत (Sulfur / Sulphur) सोने-चांदीच्या मिश्रधातूंचे शुद्धीकरण करून चांदी काढून टाकण्याची प्रक्रिया विकसित झाली होती.
नंतर खडकांतील शिरांमध्ये जमा असलेले सोने मिळविण्यासाठी, खाणकाम (Mining) केल्यावर त्यांचे दळन (Grinding) करावे लागे आणि या कामांसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज भासे. इ. स. १०० सालाच्या सुमारास स्पेनमध्ये सोन्याच्या खाणकामात ४० हजारापर्यंत गुलाम काम करीत असल्याचे संदर्भ आहेत.
सुमारे दहाव्या शतकापर्यंत सोन्याची मागणी काहीशी माफक झाली. याच सुमारास पारदमेलन (Mercury Mixtures) तंत्राचा शोध लागला. या तंत्रात सोन्याची पाऱ्याबरोबर मिश्रधातू तयार करून सोने अधिक प्रमाणात मिळविले जाते.
दक्षिण व मध्य अमेरिकेत यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकात वसाहती उभारायला सुरुवात केली आणि तेथे सोन्याचे खाणकाम व शुद्धीकरण करायला सुरुवात झाली.
अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंतच्या काळात ब्राझील आणि रशियातील उरल पर्वताच्या पूर्वेकडील उतारावर सोन्याचे मोठे साठे सापडले. १८४० मध्ये सायबीरियात सोन्याचे प्रमुख जलोढीय निक्षेप (Placer) सापडले तर १८४८ मध्ये कॅलिफोर्नियात सोने आढळले. १८८६ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील विटवॉटरस्रँड येथे सर्वाधिक सोने आढळले. १८९९ मध्ये तेथे जगातील सोन्याच्या उत्पादनापैकी २५% उत्पादन झाले (१९८५ मध्ये हे प्रमाण ४०% होते). याच सुमारास सोने मिळविण्याकरिता सायनाइडीकरण प्रक्रियेचा शोध लागला.
सोन्याचे मिश्रधातू (Alloys of Gold) :
सोने अगदी मऊ असल्यामुळे ते दीर्घकाळ हाताळताना झिजते. त्यामुळे दागदागिने, जडजवाहीर, सुवर्णपात्रे व वस्तू किंवा नाणी यांच्यात सोने न वापरता त्याच्या मिश्रधातू वापरतात. कारण सोन्याच्या इतर धातूंबरोबरच्या मिश्रधातू अधिक कठीण असतात. सोन्याचे ताणबल (Stress) कमी असते. मात्र त्याच्या मिश्रधातूंचे ताणबल जास्त असते. दागदागिन्यांत वापरण्यात येणारे सोने हे चांदी, तांबे व अल्पसे जस्त या धातूंबरोबर मिश्रधातूंच्या रूपात वापरतात. मिश्रधातूंना निरनिराळ्या पिवळसर छटा असतात, म्हणून त्यांना पिवळे सोने (Yellow Gold) म्हणतात. सोन्याच्या निकेल (Nickel), तांबे (Copper) व जस्त (Zinc) यांच्या बरोबरच्या मिश्रधातूंचा रंग पांढरा असल्याने त्यांना पांढरे सोने (White Gold) म्हणतात. सोन्याच्या मिश्रधातूंतील चांदीचे प्रमाण जसे वाढत जाते तसा पिवळसर ते पांढरा रंग होत जातो. ७०-८०% सोने असलेल्या मिश्रधातूंचा रंग काहीसा हिरवा असून यापेक्षा चांदीचे प्रमाण वाढल्यास मिश्रधातूंना हिरवट-पांढरा ते पांढरा रंग येतो ह्याला हिरवे सोने म्हणतात. (Green Gold)
सोन्यात तांबे मिसळल्यास सोन्याचा वितळबिंदू कमी होतो व २०% तांब्यामुळे तो किमान (९१०° से.) होतो. (शुद्ध सोन्याचा वितळनांक १०६४.१८° से. आहे). ही मिश्रधातू झाळकामामध्ये (solder) वापरतात. आणखी तांबे घातल्यास वितळबिंदू सावकाश वाढत जातो.
चांदी, तांबे व सोने यांच्या मिश्रधातूंचा रंग तांबूस ते पिवळसर हिरवट असून त्यांचे यांत्रिक गुणधर्म चांगले असतात. त्यामुळे त्यांचा दागदागिन्यांत व सुशोभनासाठी उपयोग होत आहे. मिश्रधातू अधिक कठीण होण्यासाठी त्यांत अल्प प्लॅटिनम व पॅलॅडियमही घालतात.
मिनाकारी (Enamelling) करीता शुद्ध सोने किंवा जस्तरहित (Zinc Free) चा वापर केला जातो.
सोन्याच्या इतर अनेक धातूंबरोबर मिश्रधातू तयार होतात. त्यांपैकी काही मिश्रधातू पुढे दिल्या असून काहींचे उपयोग व वैशिष्ट्ये दिली आहेत.
- · कोबाल्ट-सोने (Cobalt + Gold) : नीच तापमानाला वापरावयाची तपयुग्मे (Low temperature alloy) व तारा (wires),
- · जर्मेनियम-सोने (Germanium + Gold) : ट्रँझिस्टर तंत्रविद्या (Transistor Technology), चांगली उष्णता व विद्युत् संवाहकता (Good Heat & Electricity conductors),
- · निकेल-सोने (Nickel + Gold) : दागिन्यांसाठीचे पांढरे सोने व झाळकाम (White Gold & Soldering),
- · पॅलॅडियम-सोने (Palladium + Gold) : उत्कृष्ट तन्यता, उच्च तापमान तपयुग्मे, संक्षारणरोधक सामग्री, रेयॉन तनित्रे, (Excellent tensile, high temperature alloy, corrosion resistant material, rayon tannitre),
- · प्लॅटिनम-सोने (Platinum + Gold) : अल्कलाइन संगलन मुशी, संक्षारणरोधक, (Alkaline coagulation mushy, corrosion resistant),
- · जस्त-सोने (Zinc + Gold) : दंतवैद्यक व दागदागिन्यांचे डाखकाम, (Brazing)
- · सिलिकॉन-सोने (Silicon + Gold) : ट्रँझिस्टर तंत्रविद्या (Transistor Technology),
- · क्रोमियम-सोने (Chromium + Gold) : विद्युत् रोधक, (Insulator)
- · लोखंड-सोने (Iron + Gold) : उच्च विद्युत् रोधकता, (High electrical resistance)
- · शिसे-सोने (Lead + Gold) : (अग्नि-आमापन),
- · कॅडमियम-सोने (Cadmium + Gold) : (दागिने व डाखकाम),
- · पारा-सोने (Mercury + Gold) : (सोने परत मिळविणे),
- · बिस्मथ-सोने (Bismuth + Gold) अँटिमनी-सोने (Antimony + Gold) वगैरे.
सोन्यावरील प्रक्रिया (Preprocess on Gold):
डाखकाम (Soldering) :
धातू पत्र्याच्या दोन भागांना जोडण्यासाठी मिश्रधातू ची तार किंवा पत्रा वितळवून सांधले जाते, ह्यास डाखकाम किंवा सोल्डरिंग म्हटले जाते. सोने हा अत्यंत मौल्यवान धातू असल्यामुळे मुख्यतः दागीने निर्मितीसाठी ह्या धातूचा वापर केला जातो. ह्या प्रकारचे दानीने बनवत असतांना सोल्डर तंत्राचा वापर जास्त होत असतो. अश्या वेळेस एकापेक्षा अधिक वेळा सोल्डर करावे लागते व परिणामी आधीच्या सोल्डर ला क्षति पोहचत असते. त्यामुळे सोल्डरिंग करतांना सर्वात आधी हार्ड सोल्डर करावे, त्यानंतर मिडियम हार्ड व शेवटी सॉफ्ट सोल्डर चा वापर करावा. सोल्डरिंग करतांना वापरण्यात येणाऱ्या सोल्डर वायर नुसार योग्य प्रवाहक (Flux) वापरावे अन्यथा डाग पडण्याची शक्यता असते.
शक्यतो कमी वेळात सोल्डर होणाऱ्या जोड साठी जलीय प्रवाहक (Liquid Flux) आणि जास्त वेळ अग्नी देणार असल्यास पेस्ट किंवा भुकटी स्वरूपातील प्रवाहक (Paste or Powder Flux) चा वापर करावा. जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सोल्डर च्या पत्र्याची जाडी (Thickness) ही मुख्य दागिन्याच्या जाडी पेक्षा नेहमी कमीच असावी. मूळ कॅरेट पेक्षा जास्त कॅरेट चा सोल्डर पत्रा किंवा वायर वापरावी.
हल्ली बजारात तयार सोल्डरिंग पेस्ट सुद्धा इंजेक्शन माध्यमात उपलब्ध आहेत, जे वापरण्यास अत्यंत सोपे आहेत. अत्यंत जटील कामात जोडणी करावयाची असल्यास लेझर सोल्डर शिवाय पर्याय नाही.
अनुशितन (Annealing):
धातूच्या पत्र्यावर काम करून करून त्याच्या अंतर्गत संरचनेत ताण निर्माण होतो ह्यास धातू शिणवटा (Metal Hardening) म्हणतात, आणि त्यानंतरही काम केल्यास धातू फाटण्याची शक्यता असते. अश्यावेळेस धातूस योग्य प्रमाणात उष्णता देऊन त्याची अंतर्गत संरचना पुन्हा पूर्वस्थितीत येऊन धातू नरम होतो. प्रत्येक धातुनुसार हा संस्कार योग्य पद्धतीनेच करावा लागतो.
सोन्याचा पत्रा/ दागिने अनेलिंग करतांना विशेष काळजी घ्यावी लागते कारण, गरजेपेक्षा अधिक तापमान दिल्यास पत्रा आपला आकर बदलू शकतो किंवा वितळू शकतो. तसेच अतिरिक्त तापमानामुळे अंतर्गत संरचना बदलून पुन्हा पूर्ववत करण्यास कठीन जाते. कधी कधी पृष्ठभागाचा रंग बदलण्याचा किंवा ऑक्साईड तयार होण्याची सुद्धा शक्यता असते.
अतिरिक्त तापमान लागू नये ह्याकरीता नेहमीचा सराव आवश्यक आहे. तरीही नव्यानेच शिकत असतांना सोन्याच्या पत्र्यावर पावडर फ्लक्स चे द्रावण लावणे कधीही योग्य, कारण द्रावण सुकल्यानंतर पत्रा हळू हळू गरम करावा, पत्र्यावरील फ्लक्स उष्णतेमुळे पुन्हा पातळ होते त्यावेळेस उष्णता देणे बंद करायचे.
सोन्याच्या मिश्रणातील पिवळे सोने, लाल सोने व हिरवे सोने ह्यांना अनेलिंग
करतांना सुमारे ६४८° से. (१२००° फे.) पर्यंत किवा धातू चा
रंग मंद लाल (Blood Red / Dull Red) होईस्तोवर उष्णता द्यावी.
लाल सोने गरम असतांनाच त्याचे शमन करावे अन्यथा ते पुन्हा हार्ड होते, परंतु हिरवे सोने व पिवळे सोने गरम असतांनाच किंवा हवेत हळू हळू शमवले तरीही सॉफ्ट होते. पांढरे सोने (White Gold) काहीसे उच्च तापमानावर अनेलिंग होते (सुमारे ७६०° से. / १४००° फे.). सोन्याच्या ओतकाम करीता ११००° से. ते १३००° से. (२०००° फे. ते २३७०° फे.) तापमान आवश्यक असते.
सोन्याची पारख किंवा कसोटी (Testing Gold):
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी आताच्या काळात गोल्ड टंच मशीन असले तरीही पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने काळ्या पाषाणावर सोने घासून, पारखण्याचे तंत्र आहे. सोने पारखाण्याच्या दगडाच्या पद्धतीलाच भारतात “कसोटी” संबोधले जाते. ह्या व्यतिरिक्त १० कॅरेट पर्यंतचे सोने पारखण्यासाठी नायट्रिक असिड व १० कॅरेट पेक्षा अधिक शुद्ध सोने पारखण्यासाठी एक्वा रेजिया / रॉयल वाटर (Aqua Regia or Royal Water is 3 parts of Hydrochloric & 1 part of Nitric Acid) वापरण्यात येते.
सोन्याच्या संदर्भातील समान्य माहिती General Information about GOLD:
भारतीय सण, उत्सव, परंपरा ह्यात सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. वापरात असलेल्या सोन्यासाठी भारताचा ‘दुसरा’ क्रमांक आहे.
(दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग शहराजवळील “विटवॉटर्सरँड” (Witwatersrand) खोऱ्यात जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण असल्यामुळे, दक्षिण आफ्रिका सोन्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. जगात दुसऱ्या क्रमांकाची सोन्याची खाण भारतातील कर्नाटक राज्यात “कोलार” येथे असून वर्ष २००३ पासून बंद आहे; तरीही सोन्याच्या बाबतीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो.)
भारतात कोलार गोल्ड फील्ड (कोलार जिल्हा) व हुट्टी गोल्ड फील्ड (रायचूर जिल्हा) ही कर्नाटकातील आणि रामगिरी गोल्ड फील्ड (अनंतपूर जिल्हा) हे आंध्र प्रदेशातील अशी तीन सोन्याची महत्त्वाची क्षेत्रे भारतात आहेत. सोन्याचे प्राथमिक स्वरूपाचे सर्वांत मोठे साठे बिहार, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश इ. राज्यांत आहेत. तर सोन्याच्या प्रमाणानुसार कर्नाटक राज्याचा क्रमांक पहिला असून त्यानंतर राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार व आंध्र प्रदेश या राज्यांत सोने आढळले आहे.
भारतातील सरकारी सोन्याचा साठा किती आणि कुठे आहे? (How much and where is the government gold reserve in India?)
सरकारकडून सर्वांत जास्त सोनं मध्यवर्ती बँकांच्या (Reserve Bank of India) लॉकर्समध्ये साठवलं जातं. जागतिक सुवर्ण परिषद World Gold Council's (WGC) च्या आकडेवारीनुसार (वर्ष २०१९) भारताकडे तब्बल ६१८.२ टन सोने आहे. जी एकूण परकीय साठ्याच्या (foreign reserves) केवळ ९.९ टक्के आहे आणि भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे. प्रत्येक देशात असलेल्या सरकारी सोन्याच्या साठ्यावरून त्या देशाच्या चलनाचे अंतराष्ट्रीय मूल्य निर्धारित होत असते.
सोन्याची किंमत कशी ठरते? (How is the price of gold determined?)
सोन्याची किंमत लंडनमधून ठरते. 'लंडन बुलियन मार्केट' (London Bullion Market) मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात, त्या दिवशी दोन वेळा सोन्याची किंमत ठरवली जाते. लंडन वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 3 वाजता ही किंमत ठरवली जाते. या पद्धतीला 'लंडन गोल्ड फिक्स' (The London Gold Fixing or Gold Fix) म्हणतात. अशा पद्धतीने ठरवलेल्या सोन्याच्या दराला जगभरातील इतर मार्केट्समध्ये मान्यता आहे.
नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फक्त एकदाच म्हणजे सकाळी सोन्याचे दर निश्चित केले जातात. हे दर अमेरिकन डॉलर्स, पाऊंड आणि युरोमध्ये निश्चित केले जातात.
कॅरट आणि कॅरेट मध्ये फरक आहे का? (what is difference between carat and karat in?)
कॅरट (Carat) हे एक वजन मोजण्याचे एकक (Unit) आहे. एक कॅरट (Carat) म्हणजे 0.2 ग्रॅम होय. हिरे आणि इतर मौल्यवान खड्यांचे (Diamonds & Precious Stone) चे वजन मोजण्यासाठी वापरले जाते.
कॅरेट (Karat) हे सोन्याच्या शुद्धतेचे एकक (Unit) आहे. ह्यात १०० टक्के (शुद्धते) ला २४ भागात विभागले जाते. २४ कॅरेटचे सोने चा अर्थ असतो १/२४ टक्के म्हणजेच १०० टक्के शुद्ध सोने.
भारतात सोन्यासाठी “तोळा” हे एकक वापरण्यात येते. एक तोळा म्हणजे १० ग्राम.
कॅरेट म्हणजे काय? (What is Karat?)
सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने २४ कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. २४ कॅरेट गोल्डचा अर्थ असतो १/२४ टक्के शुद्ध सोने. म्हणजे शुद्ध सोन्याच्या १०० टक्के चे २४ भाग.
दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता ९१.६६ टक्के असते व ८.४४ टक्के इतर धातू जसे की, चांदी, जस्त, निकेल असू शकते.
दागिने २२ कॅरेटचे असतात. २२ ला २४ ने भागून १०० ने गुणाकार करा.
(२२/२४) x १०० = ९१.६६ म्हणजेच तुमच्या दागिन्यांसाठी वापरण्यात आलेल्या सोन्याची शुद्धता ९१.६६ टक्के आहे व ८.४४ टक्के इतर धातू जसे की, चांदी, जस्त, निकेल असू शकते.
जर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,००० रुपये असेल आणि तुम्ही बाजारपेठेत २२ कॅरेट चे दागिने विकत घेण्यासाठी गेलात तर (५०,०००/२४) x २२ = ४५,८३३ रुपये दर लागेल.
Karat |
Percentage of Purity |
01 |
04.17 |
02 |
08.33 |
03 |
12.50 |
04 |
16.67 |
05 |
20.83 |
06 |
25.00 |
07 |
29.17 |
08 |
33.33 |
09 |
37.50 |
10 |
41.67 |
11 |
45.83 |
12 |
50.00 |
13 |
54.17 |
14 |
58.33 |
15 |
62.50 |
16 |
66.67 |
17 |
70.83 |
18 |
75.00 |
19 |
79.17 |
20 |
83.33 |
21 |
87.50 |
22 |
91.67 |
23 |
95.83 |
24 |
100.00 |
IMAGE: Image by Linda Hamilton from Pixabay
0 टिप्पण्या
Subject related questions, comments and suggestions are always welcome.
Emoji_Yashwant B Bhavsar, (STUDIO MEENAMEL)